मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी 109 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यातील काही जण महामंडळाचे कर्मचारी असतील तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या सोमवारी होणार्या आढावा बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. एसटीची यंदाच्या उन्हाळी हंगामाकरिता वाहतूक कशी सुरू करायची, रस्त्यावर 12 हजार गाड्या सुरू करण्यासाठी काय नियोजन करायचे, 11 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवायची की 22 एप्रिलपर्यंत कर्मचार्यांची कामावर परतण्याची वाट पाहायची यांसह किती कर्मचारी 22 एप्रिलपर्यंत कामावर येतील याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या 27 ऑक्टोबरपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. संपकरी कर्मचारी जर 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावर मेस्मा लावता येऊ शकतो का, याचा विचारदेखील या बैठकीत होणार आहे.