अकोला- दानापूर शेत शिवारात रात्री 2 ते 3 च्या सुमारास 40 गोवंश संशयास्पदस्थितीत जाताना दिसला. याबाबतची माहिती शेतकरी व गोरक्षकांनी पोलिसांना दिली. पोलिस गोवंश ताब्यात घेऊन हिवरखेडला जात असताना समाजकंटकांनी हल्ला करून गोवंश पसार केला. याप्रकरणी पोलिसांनी समाजकंटकांवर काही अंशी कारवाई केली असली तरी गोरक्षकांवरही गुन्हे दाखल केले आहेत. हा अन्याय असून या विरोधात सोमवार, 11 एप्रिल रोजी तेल्हारा तालुका बंदचे आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केले आहे.
दानापूर शेत शिवारात 40 गोवंश रात्री 2 ते 3 च्या सुमारास संंशयास्पद पद्धतीने जाताना शेतकर्यांना दिसले.त्यांनी ही माहिती गोरक्षकांना दिली. तर गोरक्षकांनी पोलिस प्रशासनाला याबाबत कळविले. त्यानंतर हिवरखेड पोलिस स्टेशनचे तीन कर्मचारी शासकीय वाहनासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोवंश ताब्यात घेतला. मात्र पोलिसांची संख्या कमी असल्याने पोलिसांनी गोवंश पोलिस स्टेशनपर्यंत नेण्याकरिता शेतकरी व गोरक्षकांना मदतीची विनंती केली.
हा गोवंश नेत असतानाच समाजकंटकांनी 40 ते 60 च्या संख्येत येऊन शेतकरी, गोरक्षकांवर हल्ला चढविला.या हल्ल्यात पोलिसांवरही हल्ला झाल्याची चर्चा आहे. मात्र, खर्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई ऐवजी ज्या शेतकरी व गोरक्षकांनी पोलिसांची मदत केली त्यांच्या विरुद्धच पोलिसांनी शासकीय अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे या गुन्ह्याची फिर्याद प्रत्यक्षदर्शी नसलेल्या ठाणेदारांनी दिली. शेतकरी व गोरक्षक यांना खोट्या गुन्हयात अडकविल्याच्या निषेधार्थ सोमवार, 11 एप्रिल रोजी तेल्हारा तालुका विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलाने व्यापार व्यवसायासह कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.