अकोला – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती(दि.14एप्रिल) साजरी करण्यासाठी मिरवणूका, रॅली, सार्वजनिक समारंभ यासाठी आवश्यक असणाऱ्या पूर्वपरवानगी घेणे सुलभ व्हावे, यासाठी अकोला शहरासाठी महानगरपालिका तसेच अन्य भागांसाठी तहसिलदार कचेरी येथे ‘एक खिडकी योजना’ राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील संघटना व मंडळ्याच्या पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटना व मंडळाच्या सूचनेनुसार अकोला शहरात मनपा येथे तर तालुक्याच्या ठिकाणी शहरी व ग्रामीण भागासाठी संबंधित तहसिल कचेरी येथे ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात डॉ. बाबासाहेब जयंती साजरी करण्याबाबतची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा उपआयुक्त पूनम कळंबे, मनपा बांधकाम विभागाचे अजय गुजर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, बौद्ध महासभाचे अध्यक्ष पी.जी. वानखडे, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे तसेच मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, कोरोना निर्बंधात सुट दिली असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करावे, प्रत्येकाने स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावू. तसेच मिरवणूक, रॅलीसंबंधीत सर्व परवानगी एकाच ठिकाणी एक खिडकी योजनेतून मंडळाना तातडीने दिल्या जातील. या कार्यक्रमात कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी, असे आवाहन श्रीमती अरोरा यांनी केले. अशोक वाटीका येथे नागरिक मोठ्या संख्येने जमा होतात. या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. यावेळी संघटना व मंडळाच्या पदाधिकारी यांनी आपल्या सुचना व विचार मांडले.