मुंबईः शिवसेनेला (Shivsena) पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. शिवसेना नेते व महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव(Yashwant Jadhav) यांच्याशी संबंधित मालमत्तांवर टाच आणली आहे. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ४१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात भायखळ्यातील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रेतील ५ कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे. (Yashwant Jadhav Property Seized)
यशवंत जाधव हे गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर होते. काही दिवसांपूर्वीच जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांनी मिळालेल्या माहितीनंतर आचा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाने भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रे इथल्या ५ कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे.
२०१८ ते २०२२मध्ये जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी या मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. तसंच, आयकर विभागाने जाधव यांचे मेहुणे विलास मोहिते आणि पुतण्या विनीत जाधव यांना समन्स बजावले आहेत. तसंच, त्याचे स्टेटमेंटही रेकॉर्ड केलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांच्याशी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने केली आहे. मरिन लाइन्स पोलिस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे हे प्रकरण असून त्यात हवाला व्यवहार असल्याचादेखील संशय व्यक्त करण्यात आला आहे.
१५ कोटींचा व्यवहार
यशवंत जाधव यांनी उदय महावारच्या प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला १५ कोटी रुपये रोख दिले. हे १५ कोटी रुपये महावारने यशवंत जाधव यांच्याशी संबंधित सहा कंपन्यांमध्ये कर्ज दिल्याचे कागदोपत्री दाखवत वळते केले. त्यानंतर जाधव यांना प्रधान डीलर्स कंपनीची मालकी देण्यात आली, असे प्राप्तिकर विभागाच्या तपासात समोर आले असून त्याआधारेच गुन्हा दाखल करण्यासंबंधी तक्रार करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.