मुंबई : सध्या राज्यात सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला घाबरण्याची मुळीच गरज नाही. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहा, संघटना वाढीवर भर द्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना व प्रमुख नेत्यांना बुधवारी रात्री दिल्या.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप शुक्रवारी होत आहे. त्याच्या दोन दिवस आधीच मुख्यमंत्र्यांनी सेना आमदार व नेत्यांना वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते.
महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीमागे ईडी कारवाईचा ससेमिरा लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर मंगळवारीच कारवाई करण्यात आली. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेले भाष्य महत्त्वाचे ठरते. ठाकरे म्हणाले, अशा कारवायांमुळे भाजप जो माहौल तयार करत आहे त्यात कोणतीही सत्यता नाही. त्यांना सेनेला व महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचे आहे. भाजपच्या भपकेबाजपणावर जाऊ नका. आपण काहीही चुकीचे काम केले नाही आणि करत नाही. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर व जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्याचे कळते.