हिवरखेड (धिरज बजाज) :- हिवरखेड अकोट परिसरातील जनता अतिशय सहनशील असल्याने व उग्र आंदोलन छेडत नसल्याने अकोट- अकोला रेल्वेमार्गावर रेल्वेसेवा सुरू करण्यास दक्षिण मध्य रेल्वेला विसर पडला आहे काय? असा सवाल जनता करीत आहे.
सविस्तर असे की अकोट अकोला ह्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्याचवेळी या मार्गावर रेल्वेची यशस्वी चाचणी सुद्धा झाली होती. त्यामुळे या मार्गावरून तात्काळ रेल्वेसेवा सुरू होईल अशी वाजवी अपेक्षा परिसरातील रेल्वे प्रवाशांना होती. परंतु सुरुवातीला कोरोना निर्बंधांमुळे उशीर करण्यात आला. नंतर अनेक महिन्यापासून अकोट रेल्वे स्टेशन तथा अकोट- अकोला रेल्वेमार्ग आणि प्रवाशी रेल्वेसेवा इत्यादींचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, अथवा केंद्र सरकारच्या अन्य मोठ्या वजनदार मंत्र्यांच्या हस्ते सदर उद्घाटन करण्यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याने या रेल्वेसेवा आणि स्थानकाचे उद्घाटन रखडले असल्याची चर्चा सुरू होती. दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद मुख्यालय अंतर्गत येणाऱ्या नांदेड डिव्हिजनच्या टाईम टेबल मध्ये काही महिन्यांपूर्वी अकोट अकोला पूर्णा ह्या डेमु रेल्वेचा टाईम सुद्धा जाहीर करण्यात आला होता. पण नंतर या परिसरातील रेल्वे प्रवाशांवर अन्याय करणारा निर्णय घेत अकोट पूर्णा रेल्वेसेवा अकोट ऐवजी पूर्णा ते अकोला पर्यंतच सुरू करण्यात आली.
अश्याप्रकारे जाणीवपूर्वक रेल्वे सेवा सुरू न करणे कितपत योग्य आहे? असा सवाल जनता उपस्थित करीत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यशस्वी चाचणीनंतर अकोट येथून रेल्वेसेवा सुरू करण्यास अत्याधिक विलंब होत असल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला त्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न रेल्वे प्रवाशांच्या मनात खदखदत आहेत. दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर आले असताना त्यांनी अकोट येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यावरच रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल असे सांगितले होते. अकोट येथील उड्डाणपुलावरून रस्ते वाहतूक अनेक दिवसांपूर्वी सुरू झाली असतानाही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली नाही हा हिवरखेड अकोट परिसरातील रेल्वे प्रवाशांवर मोठा अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया आदर्श पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंच कडून देण्यात आली. याबाबत आदर्श पत्रकार संघातर्फे संदीप इंगळे, राजेश पांडव, अर्जुन खिरोडकार, जितेश कारिया, सुरज चौबे, राहुल गिऱ्हे, उमर बेग मिर्झा, जावेद खान, अनिल कवळकार, धिरज बजाज इत्यादी पत्रकारांनी संबंधितांना निवेदन पाठविले आहे.
प्रतिक्रिया:-
अकोट अकोला मार्गावरून रेल्वे सेवा सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंब होत असून हिवरखेड, अकोट परिसरातील जनतेच्या संयमाचा अंत पहिल्या जात आहे. रेल्वे सुरू होत नसल्याने जनतेचे शोषण होत असून वेळ श्रम पैसा वाया जात आहे.
धिरज संतोष बजाज, संयोजक हिवरखेड विकास मंच
प्रतिक्रिया:-
काही कारणास्तव अकोट अकोला मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यास उशीर झाला आहे. परंतु आता लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल.
श्री.राकेश, मुख्य जनसंपर्क अधिकारी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद.