पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर सोमवारी (दि.21) चक्रीवादळात झाल्याने देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू झाला आहे. परिणामी, राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात 25 मार्चपर्यंत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात सोमवारी उद्भवलेल्या चक्रीवादळाचा वेग ताशी 65 ते 75 किमी एवढा असून ते सध्या पोर्टब्लेअरपासून 160 किमी अंतरावर तर मायाबंदरपासून 110 किमी अंतरावर खोल समुद्रात आहे. पुढील बारा तासांत ते अंदमानातून म्यानमारकडे सरकेल आणि मग शांत होईल. या दरम्यान केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस पडेल, असा अंदाज आहे.