अकोला दि.19: होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरे करावे. तसेच मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन व अंमलबजावणी करावी, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले.
होळी / शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरुवार(दि.17) रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे पालन करुन साजरा करावा. तसेच शुक्रवार दि. 18 रोजी धूलिवंदन व 22 मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.
होळी / शिमगा सणानिमित्ताने (विशेष करून कोकणात) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.
कोविड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.