अकोला, दि.८ :- हल्लीच्या युगात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे हे सबलीकरणासाठी आवश्यक आहे. त्याकरीता अधिकाधिक युवक युवतींना रोजगाराची संधी मिळावी यासाठी दरमहा आठ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार मेळावा आयोजित करुन ही संधी उपलब्ध करुन देऊ,असा संकल्प जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे व्यक्त केला.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. २१४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य सोहळ्यास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या सह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, पोलीस उपअधीक्षक अकोट रितू खोकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ, उप प्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, लेखाधिकारी रुपाली भुईभार, सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल तसेच महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे, सहायक आयुक्त रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन डी. एल. ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, मुकेश चव्हाण तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.
स्वतःचे कौशल्य ओळखून रोजगाराची संधी शोधा-जिल्हाधिकारी निमा अरोरा
उपस्थित महिलांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, आज महिला दिनानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्यास मिळालेला प्रतिसाद पाहता. महिलांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी दरमहा आठ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल. आर्थिक स्वावलंबित्व असणे हे सबलीकरणासाठी आवश्यक आहे. सध्याच्या स्थितीत हेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोजगार उपलब्धतेसाठी अधिक संधी मिळवून देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिलांचे नेतृत्व सर्वत्र- सौरभ कटियार
अकोला जिल्ह्याच्या प्रशासनात महिलांचे नेतृत्व असल्याने, नेतृत्व गुण हे पुरुषांकडे असतात; हा समज मोडीत काढून सर्वच विभागात महिला अधिकाऱ्यांचे नेतृत्व सक्षमपणे कार्य करीत आहे. या सर्व महिला अधिकारी या अन्य महिलांसाठीही प्रेरणेच्या स्त्रोत ठरत आहेत, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले.
समानतेचा विचार रुजवावा- जी. श्रीधर
महिला व पुरुष हा भेदभाव नसावा. महिलांसाठी विशेषत्वाने काही करण्याची वेळ येऊ नये इतके हे भेद मिटावे. महिलांना सर्वच क्षेत्रात समान समजले जावे. स्त्री पुरुष दोघे समान हा विचार या समाजात रुजावा,असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.
यावेळी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनीही आपले विचार मांडले व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विविध स्टॉल्सनाही उत्तम प्रतिसाद
जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगण महिला बचत गटाच्या विविध विक्री स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सवर महिला बचत गटांनी तयार केलेली विविध उत्पादने उपस्थित महिलांचे लक्ष वेधून घेत होती. या स्टॉल्सनाही जिल्हाधिकारी निमा अरोरा व अन्य मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. महिलांनीही मुक्त हस्ते येथील वस्तूंची खरेदी केली.
रांगोळ्यांतून संदेश
नियोजन भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच मोकळ्या जागेत रांगोळ्या काढून त्याद्वारे महिला सबलीकरणाबाबत संदेश देण्यात आले होते. या रांगोळ्याही लक्षवेधी ठरल्या. प्रत्येक रांगोळी ही विविध प्रबोधनात्मक संदेश दर्शविणारी व आकर्षक दिसत होती.
या कार्यक्रमात महिला बचत गटांना अर्थसहाय्य मान्यता पत्रे, तसेच धनादेश प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैभवी विलास गवई या मुलीने गायलेले गीत ऐकवण्यात आले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. सूत्रसंचालन जया भारती यांनी केले. या कार्यक्रमास सर्व वयोगटातील व क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या होत्या.