पेशावर: पाकिस्तानातील (Pakistan) पेशावर शहरातील शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाज पठणावेळी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३० जण ठार आणि ५० हून अधिक जखमी झाले आहेत. मशिदीत नमाज पठणावेळी मोठी गर्दी होती. याच दरम्यान बॉम्बस्फोट झाला.
बचावकार्य करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार भागातील जामिया मशिदीमध्ये शुक्रवारची नमाज अदा करत असताना बॉम्बस्फोट झाला. या आत्मघाती हल्ल्याची अद्याप कोणी जबाबदारी स्वीकारलेली नाही. आतापर्यंत घटनास्थळी ३० मृतदेह मिळाले आहेत. तर १० जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
पेशावर शहर पोलीस अधिकारी इजाज अहसान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोरांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला आणि पहारा देत असलेल्या पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला. यात एक पोलिस ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात आतापर्यंत ३० जण ठार झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.pakistan