रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ आता जगाला जाणवू लागलीय. सातव्या दिवशीही युद्ध सुरुच राहिल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. ( Crude Oil Price ) आज कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये प्रति बॅरल पाच डॉलर वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०६ डॉलर झाले आहे. या दरवाढीमुळे भारतात महागाईचा भडका उडेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार, रशिया आणि युक्रेन युद्धाचा कालावधी वाढल्यास कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये आणखी वाढ होवू शकते. याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर होईल. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये प्रति लीटर १० ते १५ रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल किंमतीच भडका उडाल्यानंतर भारतातील अत्यावश्यक सेवांसह अन्नधान्य किंमतीमध्येही वाढ होईल. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढ ही भारतासाठी मोठी डोकदुखी ठरणार आहे.
Crude Oil Price : भारत कच्च्या तेलाचा प्रमुख आयातदार देश
भारतामध्ये ८५ टक्के कच्चे तेल आयात होते. ५० टक्के नैसर्गिक गॅस आयात केला जातो. या दोन्हींच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेढेत किंमती वाढल्या तर थेट याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. आता कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने भारताचे आयात बिल हे ६०० अब्ज डॉलरवर पोहचेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.