अकोला,दि. 26: विदर्भ-मराठवाडा दुध प्रकल्पांतर्गत वैरण बियाणे वितरण योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. योजनेचा निधी जनजाती क्षेत्र उपयोजनाअंतर्गत असल्याने या योजनचा लाभ अनुसुचित जमाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांनाच मिळेल. तरी इच्छुक पशुपालक शेतकऱ्यांनी दि. 12 मार्चपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले.
योजनेअंतर्गत वितरीत करावयाचे वैरण बियाणे पशुपालकांची संख्या, अपेक्षित वैरण पिकाखाली क्षेत्र आणि अपेक्षित हिरवी वैरण उत्पादन या बाबतचा विचार करुन वैरण बियाणे तालुका निहाय वितरीत करण्यात येईल. योजनेअंतर्गत उपलब्ध निधीमधुन प्रती पशुपालक 10 गुंठे(10 आर) क्षेत्राकरीता आवश्यक बियाणे व ठोंबे वितरीत करावयाचे आहे. जिल्ह्यातील ज्या अनुसुचित जमाती प्रवर्गातील पशुपालकाकडे 10 गुंठे क्षेत्राखाली बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे अशा पशुपालकांना बहुवर्षिय वैरण पिकांच्या ठोंबांचे/बियांचा पुरवठा करण्यात येईल. बियाणे/ठोंबें वितरीत करतांना हंगाम, जिल्ह्यातील हवामान, पर्जन्यमान व माती, शेतकऱ्यांची मागणी या बाबीचा सारासार विचार करुन बियांचे/ठोंब्यांचे वितरण करण्यात येईल. योजनेअंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुन्या व अधिक माहितीसाठी संबंधित पशुधन विकास अधिकारी(विस्तार), पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.