अकोला, दि.२५ : आपला देश प्रजासत्ताक आहे.याचाच अर्थ इथं प्रजा सत्ताधारी आहे, आणि लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत. नागरिकांची सरकार दप्तरी प्रलंबित असणारी कामे, एकाच जागी व्हावी, त्यांना हेलपाटे करावे लागू नये, हा ‘कर्तव्य यात्रे’चा उद्देश असून ही यात्रा केवळ जनतेच्या सेवेसाठी आहे,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जांभा बु. ता. मूर्तिजापूर येथे केले.
जांभा बु. येथे आज पालकमंत्री कडू यांच्या संकल्पनेतून ‘कर्तव्य यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पंचायत समिती सभापती उर्मिला डाबेराव, सरपंच जांभा बु. श्रीमती अरुणा इंगळे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधीक्षक अभियंता जलसंपदा सुनील राठी, कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे, सहा. कामगार आयुक्त राजू गुल्हाने, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, तहसीलदार प्रदीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस.काळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तेरानिया तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
कर्तव्य यात्रेचा शुभारंभ जांभा बु. या पुनर्वसित गावठाणात करण्यात आला. प्रारंभी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री कडू म्हणाले की, लोकांना सरकार दप्तरी असलेले एक काम करण्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागते. त्यांना खर्च तर होतोच शिवाय कामासाठी अनेक ठिकाणी जावे लागते, यामुळे अनेकदा मनस्ताप ही होतो. अशावेळी ह्या सर्व यंत्रणांना एकाच छताखाली आणून लोकांचा हा त्रास वाचविण्याचा व त्यांना पारदर्शक सेवा त्यांच्या गावात जाऊन देण्याचा हा प्रयत्न आहे. यामागे केवळ सेवाभाव हाच उद्देश आहे. याठिकाणी विविध सेवांचे स्टॉल लावण्यात आले आहे. एकाच ठिकाणी ह्या सर्व सुविधा आणल्या आहेत, असेही पालकमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केले. पुनर्वसित गावातील लोकांना द्यावयाच्या सर्व सुविधा देण्यात येतील. याठिकाणी न्याय प्रविष्ठ बाबी वगळता सर्व सेवा सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे,असेही पालकमंत्र्यानी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी लोकांना देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली. सूत्रसंचालन आकांक्षा गोमासे यांनी केले.
या उपक्रमात विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्याद्वारे नागरिकांना त्या त्या विभागांच्या योजनांची माहितीही देण्यात आली तसेच त्या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक प्रक्रियाही राबविण्यात आली. या शिवाय महिलांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती. त्याचाही महिलांनी लाभ घेऊन आरोग्य तपासणी करुन घेतली.