नाशिक: रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले नाशिकचे दोन विद्यार्थी तेथे सुरक्षित असल्याने त्यांचा कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांना एका इमारतीच्या तळघरात ठेवण्यात आले आहे. देशमुख, जोंधळे या कुटुंबांचे युक्रेनमधील घडामोडींकडे टीव्हीच्या माध्यमातून बारकाईने लक्ष आहे.
नाशिक येथील अदिती देशमुख, प्रतीक जोंधळे हे मामेबहीण-भाऊ आहेत. हे दोघेही 8 फेब—ुवारीला युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेले आहेत. तेथील खारकीव्ह विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशानंतर काही दिवस उलटताच युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे येथील देशमुख आणि जोंधळे कुटुंब तणावात होते. गुरुवारी या विद्यापीठापासून 13 ते 14 किलोमीटर अंतरावर बॉम्ब हल्ला झाल्याने येथील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांना एका इमारतीच्या तळघरात ठेवण्यात आले. त्यामध्ये अदिती आणि प्रतीक यांचा समावेश आहे.
अदिती ही नाशिकरोड परिसरातील रहिवासी असून, प्रतीक कॉलेजरोड भागात वास्तव्यास आहे. गुरुवारी अदितीचे भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेतीन वाजता कुटुंबीयांशी बोलणे झाले. यानंतर अदितीने आपण बेसमेंटमध्ये म्हणजेच तळमजल्यात जात असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर तिच्या कुटुंबांना सेंड केला.
दरम्यान, आमच्या कुटुंबीयांवर ओढवलेला प्रसंग लक्षात घेऊन केंद्र शासन व राज्य शासनाने तातडीने आमच्या मुलांना भारतात सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी देशमुख, जोंधळे कुटुंबीयांनी केली आहे.
जोपर्यंत आमची मुलगी सुखरूप भारतात येत नाही तोपर्यंत आम्हाला येथे एक एक क्षण अतिशय कठीण जात असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.
दरम्यान, खा. गोडसे यांनी देवळालीतील हेमंत देशमुख यांच्यासोबत संपर्क केला. देशमुख यांनी खा. गोडसे यांच्यासोबत आदितीचे बोलणे करून दिले. खा. गोडसे यांनी तातडीने हालचाल करून देशमुख कुटुंबीयांना दिलासा दिला.
दुपारी आमचे बोलणे झाले. तिने आम्ही सुखरूप असल्याचे सांगितले. आम्हाला आता सुरक्षित ठेवण्यासाठी एका बेसमेंटमध्ये ठेवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आमचे मुलीसोबत बोलणे झाले नाही.
– गायत्री देशमुख,
अदितीची आई
सकाळी मुलगी हॉस्टेलमध्ये होती. फायरिंग, बॉम्बचे आवाज झाल्याने बंकरमध्ये ठेवले आहे. तिने आम्हाला फोटो, व्हिडिओ सेंड केले आहेत.
– विवेक देशमुख,
अदितीचे वडील