पुणे: बारावीच्या परीक्षेतील सर्वसाधारण आणि द्वीलक्षी तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकातील 5 आणि 7 मार्च रोजी दोन्ही सत्रात घेण्यात येणार्या विविध भाषांचे पेपर रद्द करण्यात आले असून संबंधित पेपर 5 आणि 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मंडळाने जारी केले आहे. बारावीची परीक्षा 4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
बारावी आणि दहावीच्या लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील या अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.