बोर्डी (देवानंद खिरकर)- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सौरभजी कटियार यांनी भेट देऊन जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा बोर्डीची पाहणी केली. सुरुवातीलाच इंद्रधनुष्यातील रंगाची संकल्पना साकार करणारे भव्य असे पेन्सिल गेट, आकर्षक कंपाउंड वॉल, सुंदरशी फुलांची बाग, त्यातील कॅ-यांवर जगातील अति प्रभावी लोकांचे प्रेरणादायी सवयींचे संदेश, मनमोहक आकर्षक शालेय परिसर, शैक्षणिक संदेश प्रदान करणारे व्हरांड्यातील स्टोरी बोर्ड, परिपाठ फलक, शालेय इमारतीची दर्शनी बाजू, वैज्ञानिक व गणिती संकल्पना स्पष्ट करणारी Mysterious Wall, पूर्णत्वाकडे असणारी शैक्षणिक बाग, नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा व व्हरांड्यातील ग्रीलचा सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या शिक्षणासाठी कल्पकतेने केलेला वापर, व्हर्च्यूअल क्लासरूम, हँडवाश स्टेशन, आदर्शस्वच्छतागृह स्थापत्यशात्राच्या निकषाची पूर्तता करणारे रॅम्प असे मोहक चित्र व बाबी पाहून एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय शाळेत असल्याचा भास होत आहे. असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढलेत.
शासकीय शाळा म्हटली की अनेक पायाभूत सुविधांचा अभाव, शैक्षणिक दर्जावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या बाबी, अपूरी शिक्षक संख्या अशी धारणा समाजात आहे परंतु इतक्या ग्रामीण भागात असूनही नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून, भौतिक सुविधा प्राप्त करुन घेऊन, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचा विकास साधणाऱ्या अनेक शाळांपैकी ही एक शाळा, खासगी शाळा, कॉन्वेंट यापेक्षा कशातही मागे नाही. अशी शाळा जिल्ह्यातील इतरही शाळांना उत्तम मार्गदर्शक ठरेल असे मत मा मु.का.अ. यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी त्यांनी प्रत्येक वर्गाला भेट देऊन राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली. विद्यार्थ्यासोबत संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. प्रत्येक वर्गात होत असलेल्या डिजिटल साधनांच्या वापराबद्दल माहिती जाणून घेतली.
यावेळी विज्ञान शिक्षक आनंद नांदुरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या Science Week 2022 चे उद्घाटन त्यांनी डॉ.सी.वी. रमन यांच्या प्रतिमेला हारार्पण करून केले. विज्ञान सप्ताहा अंतर्गत आयोजित “मी होणार शास्त्रज्ञ” उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगाचे निरीक्षण करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता त्यांना वाचून दाखविल्या असेच प्रतिभावान विद्यार्थी प्रत्येक शाळेतून घडावे जेणेकरून समाजाचा विकास साधला जाईल असे उद्गार त्यांनी काढले. इयत्ता पहिली व तिसरीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून स्वतःचा परिचय देत मुकाअ यांचा परिचय करून घेतला. शाळेतील प्रत्येक बाबी उपयुक्त, आदर्श असून शाळेबाबत इतर अधिकाऱ्यांकडून ऐकलेल्या स्तुतीपेक्षाही आगळ्या वेगळ्या गोष्टी इथे प्रत्यक्षात पाहायला मिळाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले व मुख्याध्यापक उमेश चोरे व सर्व सहकारी यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी त्यांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.शालेय कार्यालयातील प्रत्येक बाब वैशिष्ट्यपूर्ण असून शालेय रेकॉर्ड ह्याची उत्तम रचना केल्या बाबत समाधान व्यक्त केले. तसेच गटशिक्षणाधिकारी श्री संदीप मालवे यांनी मा मुकाअ यांना श्री संतोष झामरे लिखित “इतिहासाच्या पाऊलखुणा” हे पुस्तक तर केंद्रप्रमुख श्री. संजय साळुंके यांनी कु.लता बाहाकर लिखित “बळीराणी” हे पुस्तक सस्नेह भेट दिले.
या प्रसंगी शाळेला सदैव मदत करणा-या सरपंचा सौ स्वातीताई चंदन, विस्तार अधिकारी (शि) गजाननराव सावरकर, विस्तार अधिकारी (पं) जितेंद्र नागे, ग्रामसेवक मोहोकार साहेब, विनोद गये, सुनिल लाहोरे, समाधानभाऊ चंदन, राजूभाऊ वाघमारे, सागरभाऊ भालतिलक, रमेशभाऊ राऊत व शाळेचे संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते.