अकोट (देवानंद खिरकर) : स्थानिक श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकोट येथील कु. प्रतिक्षा बाळू नागोसे हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दहावे स्थान पटकावले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची 2021 कलास्नातक परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यामध्ये तिला हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे.या निमित्ताने महाविद्यालयात छोटेखानी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील पांडे, मेरिट मिशनचे प्रमुख डॉ रवी जुमळे, कला शाखा प्रमुख डॉ. विलास तायडे व सत्कारमूर्ती म्हणून कु. प्रतिक्षा नागोसे, बाळू नागोसे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांच्या हस्ते कौटुंबिक सत्कार करण्यात आला. डॉ. रवी जुमळे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की आज मिशनचे उदिष्ट पूर्णत्वास जात आहे.महाविद्यालयातील विज्ञान, कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मेरीट मध्ये येत आहे. याचा आनंद आहे. प्रत्येक प्राध्यापकाने जर जाणिवपूर्वक प्रयत्न केले तर महाविद्यालयाचा नावलौकिक आणखी वृद्धिंगत होऊ शकतो. असे प्रतिपादन केले. कला शाखा प्रमुख डॉ. विलास तायडे यांनी कु. प्रतिक्षाने गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला असे सांगुन तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ संतोष कायंदे, प्रा. स्वाती वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी कु. प्रतिक्षा नागोसे बोलताना म्हणाली की, मी अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलगी असून माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.
तरी मी सातत्याने अभ्यास केल्यामुळे गुणवत्ता यादीत येऊ शकली. त्यासाठी मला सर्व प्राध्यापकांनी भरभरून मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. मला प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे असे तिने सांगितले.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांनी कु. प्रतिक्षा नागोसेचे मनःपूर्वक अभिनंदन केले व तीने कला शाखेतून 10 वा मिरीट पटकावुन महाविद्यालयाचे नावलौकिक केले. व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी डॉ.पी.सी. पवित्रकार, प्रा. कु. तडवी, डॉ. एम. के. नन्नावरे, प्रा. सचिन कोठेकर व प्रा. गजानन तायडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रभारी डॉ. अशोक इंगळे यांनी केले. तर आभारप्रदर्शन इतिहास विभाग प्रमुख प्रा. सचिन कोठेकर यांनी मानले. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थीनी कु. प्रतिक्षा नागोसे हिचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष अॅड. गजाननराव पुंडकर आणि कार्यकारणी सदस्य श्री केशवराव मेतकर यांनी अभिनंदन केले.