पुणे : एक वृध्द महिला फुटपाथवर भीक मागताना दिसली. तिच्याकडे नागरिकांनी विचारपूस केल्यानंतर ती सावकारीची बळी ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयीत आरोपीने व्याजासह सर्व रक्कम वसुल करूनही तिच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दिलीप विजय वाघमारे (५२, रा. गंजपेठ) असे अटक करणार्या बेकायदेशीर सावकारी करणार्याचे नाव आहे. (pune crime)
पीडीत वृध्द महिला ही ७० वर्षाची आहे. ती पेन्शन धारक असून तीने पाच वर्षापूर्वी नातीच्या दवाखाण्याच्या उपचाराकरीता वाघमारे याच्याकडून ४० हजार रूपये दहा टक्क्याने व्याजावर घेतले होते. त्या बदल्यात महिलेनी बँकत कर्ज काढून आरोपीला ४० हजारांची मुद्दल व व्याजापोटी १ लाख दिले होते.
Pune Crime : महिलेच्या अशिक्षीतपणाचा घेतला फायदा
परंतु, वाघमारे याने महिलेच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन आणखी व्याज आहे सांगून तिचे एटीएम कार्ड आणि पासबुक काढून घेतले होते. दर महिन्याला जमा होणारी पेन्शन १६ हजार ३४४ रूपये आरोपी काएून घेत होता. महिलेला महिन्याला मोजकीच १ ते दोन हजार रक्कम देत होता. पाच वर्षापासून त्याने महिलेकडून बेकायदेशिररित्या ८ लाख रूपये वसूल केले.
त्यानंतरही त्याने आणखी पैसे राहिले आहे असे सांगून एटीएम कार्ड व पासबुक देण्यास नकार दिला. वृध्द महिलेला मिळणारी रक्कम ही अपुरी असल्याने ती दवाखाण्यास खर्च होत होती.
शेवटी तिच्यावर उपासमारीची वेळ आल्याने सारसबाग येथील फुटपाथवर ती भीक मागताना मिळून आली. आरोपीच्या घर झडतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांची, पेन्शनधारकांची आठ एटीएम कार्ड, पाच पासबुक सापडले आहे.
आरोपी हा पुणे महापालिकेत झाडु खात्यात नोकरीस आहे. त्याच्याकडे कोणताही सावकारीचा परवाना नसताना तो सावकारी करताना सापडला. परिमंडळ १ च्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे निरीक्षक हर्षवर्धन गाउे, उपनिरीक्षक यशपाल सुर्यवंशी, अमंलदार श्रीकांत तुळसुलकर, महेंद्र कोलते, मुसा पठाण, बलटू घाडके यांनी ही कारवाई केली.