पुणे : दहावीच्या-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार नाहीत. तर त्या ऑफलाईन पद्धतीनेच होतील. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसारचं १० वी आणि १२ वीच्या परीक्षा होणार आहेत. ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान या परीक्षा होतील, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत दिली आहे.
१२ वी ची तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारीपासून होणार आहे. कोविड १९ मुळे शाळा तिथं उपकेंद्र करण्यात येईल. एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था असेल. सोशल डिस्टन्सिंगसाठी झिगझॅग पद्धतीने विद्यार्थ्यांना बसवले जाईल. असेही शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
यंदा बहिस्थ शिक्षक परीक्षक म्हणून न नेमता शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून काम पाहतील. बोर्डाच्या परिक्षेसाठी लस घेणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रांची संख्या चौपटीनं वाढविण्यात येतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पेपरसाठी अतिरिक्त वेळ दिला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
कोरोनाचे नियम पाळून परीक्षा होतील, असेही शिक्षण मंडळाने म्हटले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर त्याविरोधात दहावी आणि बारावीचे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.