मनमाड : ट्रेकिंगसाठी आलेल्या अहमदनगर येथील दोन तरुणांचा मनमाडपासून जवळ असलेल्या कातरवाडी भागात डोंगरावरून पडल्याने मृत्यू झाला. दोघे इंद्रप्रस्थ ट्रेकर ग्रुपचे ट्रेनर होते.
15 जणांची एक टीम शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आली होती. त्यात सहा मुली आणि सात मुलांचा समावेश होता. सुरुवातीला ट्रेनर अमोल वाघ आणि मयूर म्हस्के खिळे ठोकत दोर बांधून डोंगराच्या शेंडीवर गेले. त्यानंतर इतर 13 जण वर चढले. सायंकाळी 13 जण खाली आले. मात्र, ट्रेनर अमोल आणि मयूर खाली येत असतानाच एक खिळा निखळल्याने दोर निसटला व दोघे खाली कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघे पडल्याचे पाहून इतरांनी आरडाओरडा केला. मात्र, डोंगराची उंची जास्त असल्यामुळे खाली गावात त्यांचा आवाज पोहचू शकला नाही.
त्यांचे हातवारे पाहून ग्रामस्थ तिकडे धावले. संघरत्न संसारे, तुषार बिडगर, अमोल झालटे, प्रवीण संसारे, राजेंद्र गांगुर्डे, संतोष झालटे, तेजस ढोणे, कल्पेश सरोदे, दत्तात्रय झाल्टे, ऋषी गुंजाळ, किरण झाल्टे, विजय संसारे आदी तरुणांनी डोंगरावर जाऊन दोघांचे मृतदेह खाली आणले. ग्रामस्थांनी त्यांना धीर देत मंदिरात आणले. मृतदेह मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. डोंगरावरून शेंडी सुळक्याची उंची 120 फूट असून, या अगोदर अनेक ट्रेकर ग्रुपने ही शेंडी सर केलेली आहे. मात्र, बुधवारी ट्रेकिंगचे ट्रेंनिग देणारेच त्यावरून पडल्याAAAळे हळहळ व्यक्त होत आहे.