मुंबई : कोरोनाच्या तिसर्या लाटेचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये 90 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस आणि 70 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत, तेथील पर्यटन स्थळे आणि राष्ट्रीय उद्याने खुली करण्याचा निर्णय राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सोमवारी मध्यरात्री जाहीर केला. या निर्णयाचा लाभ कोल्हापूरसह राज्यातील 11 जिल्ह्यांना होणार आहे. (Maharashtra unlock)
दर आठवड्यात लसीकरणाचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जाईल, असे या विभागाने स्पष्ट केले आहे. सर्व राष्ट्रीय उद्याने त्यांच्या नियमित वेळांमध्ये सुरू राहतील तसेच तेथे ऑनलाईन तिकिटे उपलब्ध करून देण्यात येतील.
या उद्यानांना भेट देणार्या पर्यटकांचे दोन्ही डोस पूर्ण असावेत, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच तेथील अधिकार्यांनी पर्यटकांची संख्या किती असावी, याचा निर्णय घ्यायचा आहे.
सर्व पर्यटन स्थळांवर ऑनलाईन तिकिट उपलब्ध असेल आणि ती त्यांच्या नियमित वेळांमध्ये सुरू राहतील, असे या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यटनस्थळे खुली करण्यात येत असली, तरी तेथे मास्क, सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, भंडारा, रायगड, रत्नागीरी, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना निर्बंध शिथिलतेचा लाभ मिळणार आहे.
Maharashtra unlock : शिथिल झालेले निर्बंध
अंत्यविधीसाठी उपस्थितीची कोणतीही मर्यादा नाही
स्पा, स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरू
लग्न समारंभासाठी उपस्थितांची मर्यादा 200
हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार
नॅशनल पार्क आणि जंगल सफारी नियमित वेळेवर सुरू
उपाहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के
क्षमतेने राहणार सुरू
अम्युझमेंट पार्क, थिम पार्क 50 टक्के क्षमतेने सुरू होतील.
सर्व कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेने उपस्थिती