पुणे/वाघोली: गोल्डमॅन सराईत सचिन नानासाहेब शिंदे खून प्रकरणात जामिनावर सुटून बाहेर आलेल्या प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय २३) व त्याचे वडील कुमार मारुती शिंदे (वय ५०) या बाप लेकांचा कोयता, लाकडी दांडके व दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना लोणीकंद येथील जिल्हा परिषद शाळेजवळ बुधवारी (दि.१२) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यामध्ये ज्ञानेश्वर चव्हाण व मीनल सचिन शिंदे यांनाही गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी खून, खुनाचा प्रयत्न, आर्म अॅकट व इतर कलमानुसार लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Lonikand Crime)
दुहेरी खुनाच्या घटनेनंतर लोणीकंद परिसरात दहशतीचे वातावरण असून हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी मीनल सचिन शिंदे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, नानासाहेब शिंदे, आशितोष नानासाहेब शिंदे, निखील पाटील, ऋग्वेद वाळके, ऋतिक किनकर, निखील जगताप, माऊली कोलते, अभि गव्हाणे, शुभम वाबळे, प्रतिक कंद व इतर ४ ते ५ अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Lonikand Crime : खून प्रकरणात सनी शिंदे हा तीन महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर
सराईत सचिन नानासाहेब शिंदे याचा ९ फेब्रुवारी २०२१ रोजी लोणीकंद येथे भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सचिन किसन शिंदे, प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे, रोशनकुमार समशेर साहू उर्फ गौंड व इतरांना अटक केली होती. याच खून प्रकरणात सनी शिंदे हा तीन महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आला होता.
सचिन नानासाहेब शिंदे खून प्रकरणी जेलमध्ये असलेले सचिन किसन शिंदे, हर्षल शिंदे यांच्या जामिनासाठी शिवाजीनगर कोर्टामध्ये तारीख असल्याने ज्ञानेश्वर चव्हाण, कुमार शिंदे, सनी शिंदे व मीनल शिंदे सकाळी गेले होते. कोर्टाचे काम संपवून चौघे स्विफ्ट गाडीतून घराच्या दिशेने जात असताना सायंकाळी साडे सहाच्या सुमारास लोणीकंद येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूच्या रोडला स्विफ्ट गाडीला समोरून सफारी गाडी आडवी तर पाठीमागून डंपर आडवा लावण्यात आला.
त्यानंतर लगेच काळ्या रंगाची फॉरच्युनर गाडी येऊन उभी राहिली. दोन्ही गाड्यांमधून निखील पाटील, रुग्वेद वाळके, ऋतिक किनकर, निखील जगताप, माऊली कोलते, अभि गव्हाणे, शुभम वाबळे, प्रतिक कंद व इतर अनोळखी ४ ते ५ खाली उतरले. त्यावेळी निखील पाटील याच्या हातात पिस्तुल होता. रुग्वेद वाळके, ऋतिक किनकर व अभि गव्हाणे यांच्या हातामध्ये लोखंडी कोयते व इतरांच्या हातातील लाकडी दांडके घेवुन सर्वजण स्विफ्ट गाडीच्या दिशेने धावून आले.
कोयत्याने वार करीत गाडीतून बाहेर ओढले
स्विफ्ट आतून लॉक असल्याने कोयते व लाकडी दांडक्यांने काचा फोडुन गाडीचे दरवाजे उघडले. त्यावेळी निखिल पाटील हा ‘तुम्ही आमचे सचिन भाऊला मारले आहे, तुम्हांला सुध्दा मारणार आहे, नाना व अशितोष दादा यांनी तुमच्या सर्वांचा मर्डर करायला सांगितले आहे. त्यांचा शब्द खाली पडून देणार नाही’ असे म्हणत मीनल शिंदे यांच्या केसाला धरत बाहेर ओढले, त्यानंतर पाटील याच्या सहकाऱ्यांनी सनी शिंदे यास कोयत्याने वार करीत गाडीतुन बाहेर ओढले.
निखिल पाटील याने त्याचे जवळील पिस्तुल सनीला मारण्यासाठी उगारुन रोखून धरला असता प्रतिक कंद याने तो त्याचेकडून हिसकावून घेतला व त्याचे हातामध्ये असणारा कोयता निखिल पाटील याला दिला. इतर साथीदारांनी कुमार शिंदे यांना सुध्दा कोयत्याने वार करत गाडीतुन बाहेर ओढून सनी जवळ घेवून आले. दोघांना त्यांनी लोखंडी कोयते व लाकडी दांडक्याने सपासप मारण्यास सुरुवात केली.
मीनल शिंदे व चालक ज्ञानेश्वर चव्हाण दोघे वाचविण्यासाठी गेले ‘तुम्हाला देखील जिवे मारणार आहोत, एकही जिवंत सोडणार नाही’ असे म्हणुन माऊली कोलते याने कोयता मीनल याच्या उजवे हाताचे दंडावर जोरात मारला. चालक यांना निखील जगतापने मारहाण केली असताना चालक घाबरून पळत सुटला.
निखील पाटील, रुग्वेद वाळके, ऋतिक किनकर, माऊली कोलते, प्रतिक कंद, शुभम वाबळे यांनी रोडच्या कडेला असलेले दगड सनी शिंदे व कुमार शिंदे यांच्या डोक्यात घातले. मीनल शिंदे बचाव करण्यासाठी आरडा-ओरडा करीत रोडने जात असताना नागरिकांना मदतीसाठी बोलावले असता मारहाण करणाऱ्यांची दहशत पाहून कोणीही आले नाही.
मीनल शिंदे यांनी धावत लोणीकंद पोलीस स्टेशनला येऊन घडल्या प्रकाराबाबत पोलीसांना सांगितले. मीनल शिंदे यांना पोलिसांनी उपचारासाठी वाघोली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन ग्रुपमधील वर्चस्ववाद ठरला संघर्षाची ठिणगी
ते दोघेही चुलत चुलत भाऊ. त्यांचे आजोबा एकमेकांचे भाऊ. सर्वजण एकाच भावकीतील असे असताना केवळ परिसरात कोणाचे वर्चस्व असावे, यावरुन दोघा चुलत भावांमध्ये सुरु झालेल्या टोळीयुद्धाने बुधवारी बाप लेकाचा बळी घेतला. याबाबतची माहिती अशी, लोणीकंद, शिक्रापूर परिसरात सचिन नाना शिंदे व सचिन किसन शिंदे या चुलत भावांचा रुद्रशंभो नावाचा ग्रुप होता. त्यावरून दोघात वाद होते. (Pune Lonikand Crime)
एक म्हणत असे की तो ग्रुप मी तयार केला आहे, तर दुसरा म्हणत असे मी. त्यातूनच एकाने पुणे जिल्हा रुद्रशंभो तर दुसऱ्याने रुद्रशंभो महाराष्ट्रराज्य असा ग्रुप तयार केला. त्यातूनच पुढे परिसरातील बेकायदा व्यवसायावर वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. हे दोघेही भाईगिरी करीत असत. परिसरातील तरुण मुलांना ते आपल्या ग्रुपमध्ये ओढून घेत असत.
कोणाचे वर्चस्व असावे, यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला होता. त्यात गोल्डमॅन सचिन नाना शिंदे याचा गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात लोणीकंद पोलिसांनी १२ जणांना अटक केली होती. सचिन किसन शिंदे हा अजूनही तुरुंगात आहे.