अकोला- आज सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयापुढे दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत दोन्ही कडून चाकू, पाईप व हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आल्याने एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणात दोन्ही गटाकडून परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्याने सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी दंगलीचे गुन्हे दाखल केले आहे.
फिर्यादी मोहम्मद परवेज इलियास अहमद रा. प्रिन्स चौक, खदान याच्या तक्रारीनुसार तो भाऊ आवेस अहमद इलियास अहमदसोबत दुचाकीने बैदपुरा येथे जात असताना सर्वोपचार रुग्णालयापुढे आरोपी निसार उर्फ बबाल अरबाज खान, अतिक उर्फ मॅक्सी शाबाद खान सोनू उर्फ गेंडू यांनी थांबवून शिविगाळ करीत मारहाण केली व पाईपने हल्ला केला व जिवे मारण्याची धमकी दिली.
बचावासाठीमध्ये पडलेल्या शोएब अहमद खानवरही हल्ला करण्यात आला. या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी भांदवी कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १३५ नुसार दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. शेख अरबाज शेख अन्सार याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याच घटनेत शेख अरबाज शेख अन्सार याच्या तक्रारीनुसार शाबाद खान, आवेश, परवेज, बाबू साहेब या आरोपींनी चाकू व हॉकी स्टिकने हल्ला करून गंभीर जखमी खेले. पोलिसांनी भांदवी कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४ आणि सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला. यातील शादाब खान हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटात चाकूने वार करण्यात आले. हॉकी स्टिकने डोक्यात वार करण्यात आल्यामुळे त्यावर सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.