अकोला, दि.11: कोविड नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तालुका तसेच ग्रामिणस्तरावरील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोविड नियंत्रणात कोणत्याही प्रकारे हयगय करु नये,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.
जिल्हास्तरीय यंत्रणेकडून आज उपविभागीय तसेच तालुकास्तरीय पातळीवरील आढावा घेण्यात आला. यासाठी दूरस्थ पद्धतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो पटोकार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, राज्य उप्तादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ तसेच दूरस्थ पद्धतीने सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन प्रभारी आदी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, शासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे पालन हे तालुकास्तरावर सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून करावे. गर्दीच्या ठिकाणी कोविड चाचणीचे आयोजन करावे. तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. शाळास्तरावर लसीकरण सत्र आयोजित करणे शक्य आहे. ग्रामिण तसेच तालुकास्तरावरील रुग्णास स्थानिक पातळीवर उपचार सुविधा देण्यावर भर द्यावा. सर्व तालुका व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये असणारे ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित असल्याबाबत खातरजमा करावी. शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांच्या भेटीबाबत शासनाच्या सुचनांचे पालन करावे, ज्या ठिकाणी रुग्ण आढळला त्या भागात संपर्क चाचण्या कराव्या. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अंमलबजावणी करावी, त्या सोबत स्वतःची काळजीही घ्यावी. त्याच प्रमाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कटीयार यांनी लसीकरण वाढविण्याविषयी सुचना दिल्या.