अकोला, दि.11: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक असलेल्या मनुष्यबळासंदर्भात पदनिहाय आढावा आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घेतला.यावेळी स्थानिक पातळीवरुन ज्या कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविता येते अशा पदांची भरती प्रक्रिया सुरु करावी,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला दिल्या.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी अरोरा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी सहायक अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. अंभोरे, डॉ. दिनेश नैताम तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार वर्गनिहाय तसेच पदनिहाय पदांची माहिती देण्यात आली. सध्याची कोविड स्थिती पाहता कोविड वार्डात लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार आवश्यक कक्षसेवक, परिचारिका, स्वच्छक यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले. त्याच प्रमाणे रुग्णसंख्या वाढल्यास त्यापद्धतीने टप्प्या टप्प्याने वाढीव मनुष्यबळाची नियुक्ती करावी,असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मसिस्ट, वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका, कक्ष सेवक, स्वच्छक अशा सर्व पदांबाबत आढावा घेण्यात आला.