हिवरखेड(धिरज बजाज)-: अकोट हिवरखेड वारखेड या कोट्यावधी रुपये खर्चून नूतनीकरण झालेल्या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले होते तसेच भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे हिवरखेड परिसरात अनेक अपघात घडले होते आणि अनेक नागरिकांना आपल्या जीवाला सुद्धा मुकावे लागले होते. काली पिली स्टॉप, सेंट पॉल अकॅडमी, तेल्हारा सोनाळा टी पॉईंट, इत्यादी ठिकाणी गतिरोधक लावणे नितांत गरजेचे होते. सोबतच नवनिर्मित मार्गावर पडलेले खड्डे सुद्धा अपघातास आमंत्रण देत होते. आणि जीवित हानी सुद्धा झाली होती. उपरोक्त खड्डे बुजविण्यासाठी आणि गतिरोधक लावण्यासाठी हिवरखेड परिसरातील सर्वसामान्य नागरिक आग्रही होते. यासाठी अनेक नागरिकांनी आणि ग्रामपंचायत सदस्य वसीम बेग मिर्झा यांनी संबंधितांकडे पत्रव्यवहार सुद्धा केला होता.
तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांसाठी विशाल नांदोकार यांनी दुसऱ्यांदा उपोषण केले असता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली रस्त्या संदर्भात 5 जानेवारी रोजी आढावा बैठक पार पडली होती ज्यामध्ये जागतिक बँक प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी रस्ता देखरेख समितीचे रामाभाऊ फाटकर, उज्वल दबडघाव, सतिष उंबरकार, डॉ शहजाद खान, सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांनी तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांच्या अवस्थेबद्दलची संपूर्ण व्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे विशद केली. त्यामध्ये अकोट हिवरखेड मार्गावरील खड्डे बुजविणे व गतिरोधक तात्काळ लावण्याची मागणी सुद्धा केली. तदनंतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आकाश चौबे, मोईज जमादार, रोहित मोहतुरे, युनूस शहा, इत्यादी युवकांनी स्वतःच खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती.
सोबतच आदर्श पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये याबाबत वेळोवेळी वस्तुनिष्ठ वृत्त सुद्धा प्रकाशित केले होते. या सर्वांची दखल घेत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या पुढाकारातून कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक आणि उपविभागीय अभियंता संजय बोचे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरा अकोट हिवरखेड वारखेड रस्त्याचे खड्डे बुजविण्यात आले. आणि हिवरखेड परिसरात अत्यावश्यक ठिकाणी गतिरोधक लावण्यात आले. यावेळी अभियंता मंगेश पवार, रस्ता देखरेख समितीचे धिरज बजाज, ग्रा.प. सदस्य वसीम बेग मिर्झा, गजानन दाभाडे, उमर बेग मिर्झा, यांच्यासह आदर्श पत्रकार संघाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.