तेल्हारा: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात ब्रह्मा कुमारीज मीडिया विभागाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारीज तेल्हारा सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रमिला दिदी तर प्रमुख उपस्थिती प्रल्हादराव ढोकणे, सुरेशराव शिंगणारे सर, फंदाट सर, सत्यशील सावरकर, गोपाल भुजबले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ईश्वराच्या स्मरणाने व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा परिचय गोपाल भाऊ भुजबले यांनी प्रास्तवीकात दिला यावेळी पत्रकार बांधवांचा ब्रह्माकुमारी प्रमिला दिदी व स्नेहल दीदी यांनी पुष्गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. व ब्रह्माकुमार श्याम भाई यांनी सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत गीतांच्या द्वारे केले.
प्रमिला दीदींनी मनोगत व्यक्त करताना पत्रकार हा सकारात्मक समाज निर्मितीसाठी महत्वपूर्ण जबाबदार घटक आहे. वेळेनुसार समाजात अनेक बदल घडून येतात समाज हा सातत्याने परिवर्तनशील आहे. परंतु समाजात होणारा बदल हा मीडियाच्या भूमिकेवर अवलंबून असतो म्हणून मीडियाने समाजात सकारात्मक विचारांचे बीजारोपण करून सशक्त समाज घडवण्यासाठी मानवी मूल्यांच्या विकासाला प्राधान्य द्यावे. ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा मीडिया विभाग हा पत्रकारांच्या चांगल्या जीवनशैली सह दैवी गुण व सकारात्मक दृष्टिकोन व सामाजिक सदभावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे प्रयत्नशील आहे.
दीदींनी सर्व पत्रकारांना नवीन वर्षाच्या व पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्या दिल्या. प्रसंगी शाल, श्रीफळ, ईश्वरीय गिफ्ट व प्रसाद देऊन उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिता गिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या ज्ञानार्थीनी विशेष परिश्रम घेतले.