अकोला,दि.8: शून्य ते पाच वर्षे या वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण रविवार दि.२३ रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेची सज्जता आहे. पोलिओ डोस देतांना लसीकरण बुथवरही कोविड नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी आरोग्य यंत्रणांना दिले.
यासंदर्भात आज अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. एस. आर. ठोसर, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिमणकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदित्य महानकर तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य यंत्रणांकडून पोलिओ लसीकरणासाठी असलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. त्यानुसार, जिल्ह्यात(मनपा क्षेत्र वगळून) शून्य ते पाच वर्षे वयोगटातील १ लाख ३४ हजार ४५९ बालकांना पोलिओचा डोस द्यावयाचा आहे. त्यासाठी तीन सदस्य असलेले ५६१ तर दोन सदस्य असलेले ५६२ असे एकूण ११२३ बुथची रचना करण्यात आली आहे. एकूण २८०७ आरोग्य कर्मचारी याठिकाणी तैनात असतील. या शिवाय पर्यवेक्षक, गृहभेटीसाठी असे ही कर्मचारी सज्ज आहेत. अशी माहिती देण्यात आली. या लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षणवर्ग सुरु असून त्याचे वेळापत्रकही निश्चित आहे. अनुषंगिक साहित्य हे १५ जानेवारी पर्यंत लसीकरण अधिकाऱ्यांनी वाटप करावयाचे आहे. तसेच २० जानेवारी पर्यंत लस वाटप करावयाची असून लसीची शितसाखळी नियमित ठेवण्यासाठी आवश्यक साठवण यंत्रेही देण्यात आले आहेत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.