राजगुरूनगर (पुणे) : वयाच्या ८० व्या वर्षी वृद्ध वडिलांनी लग्न करण्याच्या हेतूने वधुवर सुचक मंडळात नाव नोंदणी केल्याची माहिती मुलाला मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर मुलाने वडिलांचा निर्घुण खून केला.
समाजात वावरताना अपमान होईल, मालमत्तेत हिस्सेदार होईल या रागाने मुलाने थेट वडिलांच्या गळ्यावर कांदा कापण्याची सुरी चालवली. बोथट सुरीने गळा कापेना म्हणून मुलाने घरातील दगडी वरवंटा तोंडावर, डोक्यावर हाणून वडिलांना संपवले
खुनानंतर मुलाने पोलीस ठाण्यात जाऊन या गुन्ह्याची माहिती देत तोच फिर्यादी झाला. राजगुरूनगर शहरात गुरुवारी (दि. ६) सायंकाळी ही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली.
शंकर रामभाउ बो-हाडे, (वय ८०) असे मयत वडिलांचे नाव आहे. तर शेखर ( वय ४७, रा. नंदादिप हौसिंग सोसायटी, बी विंग, फलॅट नंबर ९, वैषंपायनआळी, राजगुरूनगर ता. खेड) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
आरोपी मुलाने पोलिसांना सांगितले की, माझे वडील शंकर रामभाऊ वधुवर सुचक मंडळात पैसे भरून स्वतःच्या लग्नाची नोंदणी केली. ते माझ्याशी खोटे बोलले. याचा राग मला अनावर झाल्याने मी किचनरूममधील कांदा कापण्याची सुरी घेऊन वडिलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. म्हणून मी घरात असलेल्या दगडी वरवंट्याने तोंडावर व डोक्यात मारून त्यास जीवे ठार मारून खून केला आहे. तसेच वारंवार सुरीला धार लावून गळा कापण्याचा प्रयत्न केला, असेही त्याने म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव हे करत आहेत.