अकोला दि.7: गितासारख्या मनोरंजक पद्धतीतून महत्त्वाचे जनजागृतीपर संदेश देण्याचा प्रयत्न हा स्तुत्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.
कोविड लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी तयार केलेल्या गीताचे विमोचन आज जिल्हा प्रशासनातर्फे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन भवनातील छत्रपती सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एस. काळे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिर साहेब, सिद्धार्थ शर्मा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमापूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गीताचे विमोचन करण्यात आले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, गिताच्या माध्यमातून लोकांना कोविड लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून असे महत्त्वाचे संदेश प्रसारित करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत जनजागृती होण्यात मदत होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी ही आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. सिद्धार्थ शर्मा व शौकत अली मिरसाहेब यांनीही पत्रकार दिनानिमित्त आयोजित उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी पत्रकार दिनाची पार्श्वभुमि सांगून प्रशासन व पत्रकारांमधील सौहार्दपूर्ण संबंध सकारात्मक वातावरण निर्मितीस कारणीभूत ठरत असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी गीताचे व्हिडीओ सादरीकरण करुन प्रत्यक्ष नृत्यही सादर करण्यात आले. तसेच गीतकार मुकुंद नितोने, नृत्यदिग्दर्शक रहिम शेख, मोहसिन शेख, तंत्रज्ञ विश्वास साठे, गायिका निता खडसे, गायक संजय खडसे,सुगत वाघमारे यांना तसेच नृत्य कलावंत व अन्य तंत्रज्ञांना सन्मानित करण्यात आले.आभार प्रदर्शन डॉ. निलेश अपार यांनी केले. तर गजानन महल्ले व निशा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला पत्रकार, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.