तेल्हारा :- तेल्हारा शहरातून विविध ठिकाणी जाणाऱ्या जीवघेण्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सराफ लाइन तेलारा व परिसरातील शाळकरी, महाविद्यालयीन युवती पुढे सरसावल्या असून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक निवेदन दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी तेल्हारा तहसीलदारांमार्फत सादर केले आहे.
शहरातील विविध धर्म, जाती, पंथ, संप्रदायाच्या महिलांनी सादर केलेल्या निवेदनातून तेलारा परिसरातील सर्वच रस्ते दुर्लक्षित राहिल्याचा व सर्वच राजकीय पक्षांची नेते मंडळी याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप केला आहे. व्यापारी, शेतकरी, नोकरी करणारे रुग्ण, विद्यार्थी यासह गरोदर महिला वृद्ध नागरिक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या दयनीय रस्त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अनेकांना अपंगत्व आले, अनेकांना मणक्याचे, कंबर दुखी व पाठ दुखी चे आजार ग्रासले आहेत. धुळीमुळे दुतर्फा असलेल्या शेती पिकांना धोका उत्पन्न झाला असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या प्रलंबित रस्त्यांच्या प्रश्नावर शासनाने त्वरित तोडगा काढावा व या समस्येतून मुक्तता करावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रतीलीपी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, जिल्हाधिकारी अकोला यांना पाठविण्यात आले आहेत.