राजगुरूनगर: ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असा थेट इशारा खासदार संभाजीराजे यांनी पुण्यातील राजगुरूनगर येथे दिला.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या स्मृर्तीस्थळी ‘एक क्षण हुतात्म्यांसाठी’ उपक्रम राबविण्यात आला आहे. शहरातील युवकांनी राबवलेल्या या उपक्रमात सहभागी होऊन हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी संभाजीराजे बुधवारी (दि. ५) हुतात्मा स्मृती स्थळाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर मत मांडले.
यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. पुढे निवडणुका घ्यायचे की नाही याउलट सरकारला सांगावे लागेल की, जो इंपेरियल डेटा गोळा करायला सांगितला आहे, तो गोळा केला की नाही असे त्यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य आणि केंद्र सरकारने आपापली जबाबदारी पार पाडायला हवी. त्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही.
पहिल्यांदा मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होणे गरजेचे आहे. इतर आरक्षण अबाधित ठेऊन ओबीसीच्या आरक्षणावर कुठे धोका होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवे. याच्यावर विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्रित आल्याशिवाय तोडगा निघणार नाही, असे सूचक वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संभाजीराजे यांनी सुरू असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलकांनी यावेळी त्यांना निवेदन दिले.