तेल्हारा: तेल्हारा तालुक्यातील तूदगावचे भूमिपुत्र धनराज जानकीराम वानखडे यांनी भारतीय सेनेतील महार रेजिमेंट मध्ये चोवीस वर्षे सेवा पूर्ण करून आल्याबद्दल त्यांचे तेल्हारा येथे प्रथम आगमन प्रसंगी आजी-माजी सैनिक संघटना तेल्हारा तालुका तर्फे भव्य स्वागत आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात तेल्हारा येथील टावर चौक मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला निवृत्त सैनिक धनराज वानखडे आणि त्यांच्या पत्नी द्वारे पूजन व हारार्पण करून मुख्य रस्त्यावरून कोरोना नियमाचे पालन करून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर श्री संत तुकाराम चौक येथे हारार्पण करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे छोटेखानी स्वागत समारंभाची सुरुवात झाली. सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची वंदना आणि पूजन करण्यात आले. निवृत्त सैनिक वानखडे त्यांच्या पत्नी शालिनी वानखडे आणि त्यांच्या मातोश्री कवंताबाई वानखडे यांचे सैनिक संघटनेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष सौ. जयश्रीताई फुंडकर, नायब तहसीलदार गुरव साहेब, ठाणेदार श्री ज्ञानोबा फड साहेब, एडवोकेट पवन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला महिलावर्ग, विद्यार्थी वर्ग आणि भारतीय सैनिकांच्या वीरनारी सुद्धा उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी समीक्षा माकोडे या मुलीने देशभक्तीपर गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन माजी सैनिक पांडुरंग खुमकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाऊलझगडे संयोजक निवृत्त सुभेदार श्री. सुरेश जवकार साहेब आणि त्यांचे सहकारी सर्व माजी सैनिकांनी अथक परिश्रम घेतले. निवृत्त नायब सुभेदार धनराज वानखडे हे अवघे दहा वर्षाचे असताना त्यांचे वडील जग सोडून निघून गेल्यावर त्यांच्या आईने त्यांचे संगोपन करून त्यांना भारतीय सेनेत पाठविण्याचे समजले जाते.