तेल्हारा(प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जेष्ठ साहित्यिक डॉ. रमेश अंधारे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख हे मानव मुक्तीचे कृती युग निर्माण करणारा महामानव आहे. भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणेच डॉ. पंजाबरावांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी सर्वच क्षेत्रात कार्य केल्याचे म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजिवन सदस्य तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य सुरेशदादा खोटरे होते. व्यासपीठावर ॲड. विश्वासराव नेरकर, बाळकृष्ण मार्के, सोयब अली मीर साहेब, माधवराव खोटरे, दादाराव पाथ्रीकर, रमेश कोकाटे आजिव सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, प्रा.उदय देशमुख, सुधिर देशमुख, शांताराम वाकोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाल ढोले, जयंती उत्सवाचे समन्वयक प्रा. योगेश कोरपे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य ढोले यांनी विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाच्या विकासाकरिता जयंती उत्सवाचे महत्व अधोरेखित केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा खोटरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. पंजाबराव देशमुखांनी स्थापन केलेल्या संस्थेमुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रा.योगेश कोरपे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.