मुंबई: पत्रकारिता, संघटन आणि सामाजिक क्षेत्रात सर्वोत्तम काम करणाऱ्या तालुका पत्रकार संघाना दरवर्षी स्व. वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. नऊ महसूल विभागातून नऊ तालुका संघांची त्यासाठी निवड केली जाते.
राज्यातून एका जिल्हा संघाचा देखील रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा संघ पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. गेली सात वर्षे राज्याच्या विविध भागात होणाऱ्या शानदार समारंभात हे पुरस्कार दिले जातात. मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्यात हे पुरस्कार प्रतिष्ठेचे समजले जातात. अनेक ग्रामीण पत्रकार संघ चांगले काम करतात. त्यांची राज्यस्तरावर दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे हा या पुरस्कारांचा उदेदश आहे.
२०२१ च्या आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्या नावाची ६ जानेवारी रोजी घोषणा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच जानेवारी २०२२ पर्यत शिफारशी मागविण्यात येत आहेत. परिषदेचे उपाध्यक्ष, विभागीय सचिवांनी आपल्या विभागातील तालुका संघाच्या पुरस्कारासाठी शिफारशीं करावयाच्या आहेत. आलेल्या शिफारशींमधून अंतिम निवड परिषद करेल. जिल्हा संघाची निवड परिषद करेल..
सर्व उपाध्यक्ष आणि विभागीय सचिवांनी याची नोंद घ्यावी. कोरोनाची स्थिती पाहून पुरस्कार वितरणाची तारीख आणि स्थळाची घोषणा करण्यात येईल. पुरस्कार वितरण अधिवेशनात न करता स्वतंत्रपणे कार्यक्रम घेऊन पुरस्कार दिले जातील अशी माहिती अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व सरचिटणीस संजीव जोशी यांनी दिली आहे.