अकोला, दि.28: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला तथा क्रीडा परिषद, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन रविवार दि.२ जानेवारी २०२२ रोजी गुगल मिट, ऑनलाईन पद्धतीने सकाळी ११ वाजेपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या दोन कलांचा समावेश राहणार असून, लोकगीतासाठी साथसंगत देणाऱ्या कलावंतांसह जास्तीत जास्त दहा स्पर्धक व लोकनृत्य या स्पर्धेमध्ये वीस स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक व साथसंगत देण्याऱ्याचे वय १५ ते २९ वर्षा दरम्यान असावे. लोकनृत्य सादर करणाऱ्या संघास पुर्वाध्वनिमुद्रीत टेप अथवा रेकॉर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही. तसेच लोकगीत सादर करणाऱ्या संघाचे गीत व लोकनृत्य चित्रपट बाह्य असावे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सव स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज शनिवार दि.१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे सादर करावे. विहीत मुदतीपूर्वी आपल्या संघाची नोंदणी कार्यालयास दिल्यानंतर आपणास स्पर्धेपूर्वी स्पर्धा आयोजनाची ऑफलाईन लिंक व वेळ कळविण्यात येईल व दिलेल्या वेळेवर संघास लिंकवर ऑनलाईनद्वारे आपल्या इच्छुक स्थळावरून सादरीकरण करावे लागेल. सहभागी होणाऱ्या स्पर्धकास दिलेल्या निश्चित वेळेतच स्पर्धेत ऑनलाईन उपस्थित राहून कामगिरी, कौशल्य दाखवावे लागेल. सादरीकरणाच्या ऑनलाईन परीक्षणाकरीता पंच, निरीक्षक यांचे मार्फत क्रीडा कार्यालयामधुन परीक्षण करण्यात येईल. प्रथम क्रमांकाच्या संघाची विभागीयस्तरावर निवड करण्यात येईल.
जिल्हास्तर युवा महोत्सवाचे प्रवेश अर्ज सादर करतांना संस्थेने, मंडळाने स्पर्धकांचे प्रवेश अर्ज विहीत नमुन्यातील ओळखपत्र (इंग्रजी / मराठी), आधारकार्ड व जन्मतारखेचा दाखला असणे आवश्यक आहे. ओळखपत्रावर स्पर्धकांची नावे स्पष्टपणे नमुद असावी. अधिक माहिती व नियमावलीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थेने, मंडळाने आपले प्रवेश अर्ज विहीत मुदतीत या कार्यालयात सादर करावे. विहीत मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, याची नोंद घ्यावी. जिल्हा क्रीडा अधिकारी द्वारा आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.