पुणे : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणात सायबर पोलिसांनी रविवारी बीडमधून संजय शाहूराव सानप (वय ४०, सध्या रा. धनंजय निवास, संत ज्ञानेश्वर नगर, बीड, मुळ – वडझरी, ता. पाटोदा, बीड) याला अटक केली. सानप हा आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणातील महत्वाचा एजंट आहे. सानप याने त्याच्या गावातील एका मंगल कार्यालयात परीक्षा देणारी मुले एकत्र करून पेपर फोडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. वडझरी या गावातील एजंटांची साखळी खूप मोठी आहे. पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी हे बीड जिल्ह्यातील आहेत.
सानप हा भाजपा युवा मोर्च्याचा माजी पदाधिकारी आहे. आरोग्य पेपर फुटीमध्ये आतापर्यंत १८ जणांना अटक केली असून त्यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यातून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोग्य पेपरफुटी प्रकरणात भूम, उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालय सहायक अधीक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप याला सायबर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने एजंट संजय सानप याला आरोग्य विभागाचे गट क व गट डचे पेपर पुरविल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक मीनल सुपे -पाटील व त्यांच्या सहकार्यांनी संजय सानप याला रविवारी अटक केली.