कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’चा अखंड जयघोष, भिरभिरणारे भगवे ध्वज, नेत्रदीपक लेसर सिस्टीमचा झगमगाट आणि शिवभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती, अशा शिवमय वातावरणात सोमवारी छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांचे 40 फूट उंच आणि 100 फूट रुंद भव्य पोस्टर झळकावण्यात आले. यानंतर साऊंड सिस्टीमवर महाआरती म्हणत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करणार्या कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले.
कर्नाटकातील बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना समाजकंटकांनी दोन दिवसांपूर्वी केली. याचे तीव्र पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. याच कालावधीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घटनेविषयी अवमानकारक शब्द वापरल्याने त्याबद्दलही मराठी भाषिकांसह विविध पक्ष-संघटनांच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. याचाच एक भाग म्हणून सोमवारी कोल्हापुरात शहर शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रारंभी शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यानंतर टाळ्यांच्या गजरात महाआरती झाली. यावेळी ऋतुराज क्षीरसागर, रविकिरण इंगवले, जयवंतराव हारुगले, धनाजी दळवी, दीपक गौड, किरण पाटील, अश्विन शेळके, राजू हुंबे, टिंकू देशपांडे, तुकाराम साळुंखे, रणजित जाधव, सुनील जाधव अविनाश कामटे, अक्षय कुंभार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना काय आहे, हे योग्यवेळी दाखवून देऊ : क्षीरसागर
राजेश क्षीरसागर म्हणाले, आज आपण निषेध नोंदविण्यासाठी जमलो आहोत. यामुळे कोणताही दंगाधोपा न करता आपल्या भावना व्यक्त करा; पण शिवसेना काय आहे? हे शिवसैनिक योग्यवेळी दाखवून देईल, असे म्हणत शिवछत्रपतींची विटंबना करणार्या नराधमाला उचलून आणून ठोकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणा…
शिवछत्रपतींच्या भव्य पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे लिहिण्यात आले होते. यामुळे आजपासून या चौकाला ‘शिवाजी चौक’ असे न म्हणता ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे कोल्हापूरकरांनी म्हणावे, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.
दरम्यान, शिवसेनेच्या आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक सायंकाळी 6 ते 9 अशी तीन तास ठप्प झाली होती. आंदोलनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम, भव्य पोस्टर झळकावण्यासाठी दोन क्रेन, वेल्डिंग मशिन्स, जनरेटर अशा यंत्रणेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली. केवळ आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, शिवसैनिकांनी आरती व पोस्टर लावण्यास परवानगी मागितली. याला पोलिसांनी नाकारले. पोलिसांनी याबाबत राजेश क्षीरसागर यांच्याशीही बोलणे सुरू ठेवले होते.
आंदोलनास हरकत नाही; पण साऊंड सिस्टीम वाजल्यास गुन्हे नोंद करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. आंदोलनकर्ते व पोलिस आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवाजी चौकात राजेश क्षीरसागर यांचे आगमन होताच घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी नियोजित आंदोलन पूर्ण केले. यावेळी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत पोस्टर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.