अकोला, दि.14: जिल्ह्यात कोविड लसीकरणाने वेग घेतला असून आतापर्यंत ७५.५ टक्के व्यक्तिंनी पहिला डोस तर ३६.०४ टक्के व्यक्तिंनी दुसरा डोस घेतला आहे. थोडक्यात पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस विहित मुदतीत घेणे आवश्यक असून नागरिकांनी आपल्या मुदतीत दुसरा डोसही घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तिंचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे, असेही वैद्यकीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
तसेच या आधी नागरिकांच्या मागणीनुसार लसीकरण केंद्र उपलब्ध करुन देण्याऐवजी आता आरोग्य केंद्र निहायच लसीकरण सुविधा उपलब्ध असेल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात कोविड लसीकरणाला वेग आला आहे. लसीकरणाला प्रतिसादही मिळत आहे. जिल्ह्यात १४ लक्ष ३३ हजार लाभार्थ्यांना (१८ वर्षे वयावरील) लस देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पहिला डोस आतापर्यंत १० लक्ष ८५ हजार नागरिकांनी म्हणजेच ७५.५ टक्के लोकांनी घेतला आहे. तर ५ लक्ष १६ हजार ४२७ व्यक्तिंनी म्हणजेच ३६.०४ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच राज्यस्तरावरील आकडेवारी पाहता अकोला जिल्हा सध्या लसीकरणाबाबत २५ व्या क्रमांकावर आला आहे, अशी माहिती लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ.मनिष शर्मा व डॉ.अनुप चौधरी यांनी दिली आहे.
लसीकरणासाठी नागरिकांच्या मागणीनुसार जिल्ह्यात वाढविण्यात आलेली अतिरिक्त लसीकरण केंद्रही आता कमी करण्यात येत आहेत. तथापि, जिल्ह्यात १०० ठिकाणी लसीकरण सुविधा उपलब्ध राहणार आहे. जी पूर्वीप्रमाणेच सर्व शासकीय आरोग्य केंद्रांवर उपलब्ध असेल,असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्हा प्रशासनाकडे कोविडच्या लसींची मात्राही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोव्हिशिल्ड २ लक्ष तर कोव्हॅक्सिन ६० हजार लस उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
डॉ. शर्मा यांनी सांगितले की, ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तिंची संख्या ८० टक्के झाल्यास ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका समाजात कमी असेल. ज्या व्यक्तिंना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले त्या व्यक्तिंचे लसीकरण झालेले नव्हते, अशी त्यांची वैद्यकीय पार्श्वभुमि सांगते, त्यामुळे लसीकरण झाल्यास संभाव्य तिसरी लाट आपण थोपवू शकतो,असेही डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.