अकोला,दि.8:- कोविड १९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांना ५० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपत्ती व मदत पुनर्वसन विभागाने शासन निर्णयही निर्गमित केला आहे. त्यानुसार शासनाने अर्जदारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले आहे, त्यावर मयत व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकास कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करता येईल.त्या संकेतस्थळावर अर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती-
त्यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉग ईन करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशिल जसे मृत्यू प्रमाण पत्र आणि रुग्णालयाचा तपशिल या कागदपत्राच्या आधारे त्याचा स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळविण्यासाठी लॉग ईन करता येईल. अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in वर Document Required या टॅब वर उपलब्ध आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह सहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.