मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (महापरिनिर्वाण दिन) दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. अजित पवार यांनी यावेळी आपल्याला बाबासाहेबांनी सांगितेलेल्या समता, एकता, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारावंर देश पुढे न्यावा लागेल. जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांनी घ्यावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतात. प्रकृतीच्या कारणामुळे यावर्षी मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील सहकारी आम्ही येथे येऊन महामानवाला अभिवादन केलं आहे. त्यांच्या विचारावर राज्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.
जातीय सलोखा राहावा, समाजात तेढ निर्माण होणार नाही याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांनी घ्यावी. कधीही कुठल्याही एका घटनेकडं राजकीय भूमिकेतून न पाहता मार्ग निघेल याकडे पाहावे. हे बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला आणि विश्वाला सांगण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना अभिवादन करतो, असे अजित पवार म्हणाले.
समीर वानखेडेही चैत्यभूमीवर
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनीही चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (महापरिनिर्वाण दिन) अभिवादन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत होते. आंबेडकर यांच्याशीही वानखेडेंनी काही वेळ चर्चा केली. मात्र, दोघांमध्ये कोणत्या विषयावर बोलण झाले, हे कळू शकले नाही.
वानखेडेंच्या विरोधात घोषणाबाजी
वानखेडें पाठोपाठ अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकही चैत्यभूमीवर दाखल झाले. त्याचवेळी समीर वानखेडेंच्या विरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात बाचाबाची झाली. वानखेडेंच्या मुद्द्यावरुन समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. समीर वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हणत भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने त्यांना विरोध केला.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसेच कोरोना बाबतचे नियम पाळले जावेत म्हणून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कोव्हिडचे संकट असल्याने प्रशासनाने गर्दी न कोव्हिडबाबत सुरक्षेचे उपाय योजना करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील शेकडो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.