मुंबई: मराठी पत्रकार परिषदेचा ८३वा वर्धापन दिन आज राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. जवळपास २०० तालुक्यातील 8000 हजारावर पत्रकारांनी आज आपली आरोग्य तपासणी करून घेतली. मराठी पत्रकार परिषदेच्या आम्ही आमच्यासाठी या उपक्रमास राज्यातील पत्रकारांनी जोरदार प्रतिसाद दिल्याबददल एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांचे आभार मानले आहेत.
मराठी पत्रकार परिषदेची स्थापना ३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत झाली. स्थापना दिवसाचे स्मरण म्हणून महाराष्ट्रातील पत्रकार हा दिवस दरवर्षी साजरा करतात. या दिवसाचे औचित्य साधून गेली पाच वर्षे पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते. स्थानिक डॉक्टर्स तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा उपक्रम पार पाडला जातो. यावर्षी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राज्यभर साजरा करण्यात आला. राज्यातील ३५४ तालुक्यांपैकी जवळपास २०० तालुक्यात आज आरोग्य शिबिरं घेण्यात आली. त्यामधून ब्लड, शूगर, इसीजी, नेत्र तपासणी सारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या. राज्यभरातून किमान ८ हजार पत्रकारांनी या उपक्रमात भाग घेऊन स्वतःच्या आरोग्याच्या विविध चाचण्या करून घेतल्या.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील वडवणी येथील आरोग्य तपासणी शिबिरात भाग घेऊन विविध आरोग्य विषयक चाचण्या करून घेतल्या. डॉ. विजय निपटे यांच्या रूग्णालयात झालेल्या या कार्यक्रमात रोटरीच्या वडवणी शाखेच्या वतीने सर्व व्यवस्था करण्यात आली. यावेळी रोटरीचे अध्यक्ष श्री. भालेराव, डॉ. पुरबे, डॉ. बोंगाणे तसेच मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे, वडवणी शाखेचे अध्यक्ष विनायक जाधव व शहरातील अन्य पत्रकार, डॉक्टर्स मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्यातील तपासणी शिबिरात ज्या पत्रकारांना पुढील उपचाराची गरज असल्याचे निष्पन्न झाले आहे अशा पत्रकारांची मुंबई टीमच्या वतीने मुंबईत पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यातील नागपूर, अमरावती, गडचिरोली पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड पर्यत सर्व जिल्हे आणि तालुक्यात आरोग्य शिबिरं संपन्न झाली. धुळे तालुका पत्रकार संघानेही सोयीनुसार दि. 5 डिसेंबर रोजी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ तसेच राज्यातील सर्व पत्रकारांनी आरोग्य शिबिरांना दिलेल्या प्रतिसाद, आणि आरोग्य शिबिरं यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या सहकार्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, सोशल मिडिया सेलचे प्रमुख बापुसाहेब गोरे, प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, महिला संघटक जान्हवी पाटील, यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
फोटो कॅप्शन :- मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख हे स्वत: बीड जिल्ह्यातील वडवणी येथे शिबिरात आरोग्य तपासणी करून घेतांना दिसत आहेत.