मुंबई : RTPCR Test : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात चिंतेचे सावट पसरलंय. यामुळे अनेक देशांनी आफ्रिकेतून येणाऱ्या विमान प्रवासावर निर्बंध घातलेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल आणि वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागानेदेखील विमान प्रवासांसाठी निर्बंध लादलेत. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.
हाय रिस्क असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाइन सक्तीचे आहे आणि दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी संबंधित प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करायला हवी. जर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्या प्रवाशाला हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवे. जर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरी संबंधित प्रवाशाला ७ दिवस होम क्वारंटाइन करायला हवे.
हाय रिस्क सोडून अन्य कोणत्याही देशांतून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरच आरपीसीआर चाचणी (RTPCR Test) सक्तीची आहे. त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरी त्याला १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहवे लागेल. जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवे.
आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाबरोबर देशांतर्गत वाहतुकीबाबतही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच देशांतर्गत विमान वाहतूक करता येणार आहे. अथवा ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल आवश्यक आहे.
ओमायक्रॉन व्हेरियंटच्या धास्तीमुळे केंद्रासह अनेक राज्यांनी विमानतळ प्रशासनाला कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्यात.
ओमायक्राॅनच्या वाढत्या संसर्गामुळे जागतिक पातळीवर सर्व देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक देशांकडून युद्धपातळीवर निणर्यदेखील घेतले जात आहे. ओमायक्राॅन संसर्गाचा धोका उद्भवू नये म्हणून कॅनडाने इजिप्त, नायेजरिया, मालवी येथून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.