एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी आता बैठकांचा जोर वाढला आहे. आतापर्यंत 8343 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. सरकारने स्थापन केलेली त्रिसदस्यीय समिती विलीनीकरणाच्या मागणीचा अभ्यास करत आहे.
त्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने पगारवाढीची ऑफर दिली आहे. त्यावर उद्या सकाळी निर्णय होणार आहे. दरम्यान, जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी आंदोलन केले. परब यांच्या घरावर काळी शाई फेकण्याचाही प्रयत्न केला. त्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव असलेल्या आटपाडी आगारातून तब्बल 27 दिवसांनी एसटी बसेस सोडण्यात आली आहे. तसेच सांगली विभागातून 50 बसेस मार्गस्थ झाल्या आहेत. तर सायं. 7 वाजेपर्यंत विविध मार्गांवर 236 बसेसमधून 4,227 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी दिवाळीआधीपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्यासंदर्भात सुरू असलेल्या बैठकांचा जोर सुरूच आहे. काल एसटीच्या संपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी नेहरू सायन्स सेंटर येथे चार तास चर्चा केली. त्यानंतर आज शरद पवार यांच्याशी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चर्चा केली. तर सायंकाळी एसटी संपाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या शिष्ठमंडळाशी सह्याद्री अतिथी गृहावर परिवहन मंत्री अनिल परब यांची चर्चा झाली. असा बैठकांचा सिलसिला सुरू असतानाच दुसरीकडे मंगळवारी एसटी महामंडळाचे 8,343 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. या 5759 कर्मचारी प्रशासकीय विभागाचे, 2060 कर्मचारी कार्यशाळेचे, 330 कर्मचारी चालक, 194 कर्मचारी वाहक असे 8,343 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. महामंडळाने आतापर्यंत 3052 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून 645 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे.
तब्बल 27 दिवसांनंतर एसटी सुटली …
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव असलेल्या आटपाडी आगारातून तब्बल 27 दिवसानंतर प्रथमच तीन साध्या बस गाडय़ा आटपाडी ते भिवघाट मार्गावर सोडण्यात आल्या. एसटीच्या संपात आटपाडी आगार सर्वप्रथम बंद पाडण्यात आले होते. तर सांगली विभागातून 50 बसेस मंगळवारी विविध मार्गांवर रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचे वर्चस्व असलेल्या भागातून एसटी सेवा सुरू करण्यात महामंडळाला यश आले आहे. दरम्यान, सायं.7 वाजेपर्यंत विविध विभागातून 236 एसटी बसेस आज सोडण्यात आल्या असून त्याद्वारे 4,227 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे.
विविध मार्गांवर 151 बसेसमधून 2,702 प्रवाशांची वाहतूक
कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासकीय विभागाचे 5759, कार्यशाळांमधील (वर्कशॉप) 2060, 330 ड्रायव्हर, 194 कंडक्टर्स
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, धुळे, संभाजीनगर, सांगली, जळगाव, सोलापूर, वर्धा विभागातून एसटी बसेस सुटल्या