मुंबई: विद्यार्थ्याच्या लसीकरणानंतर शाळा सुरू कराव्यात, असा सल्ला टास्क फोर्सने मुंबई महानगरपालिकेला दिला आहे. यामुळे मुंबईतील पहिली ते पाचवीचे वर्ग उघडण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शाळा सुरु होणार नसल्याने पालक व शिक्षकांतून संतापाची लाट उसळली आहे. १८ महिने विद्यार्थी शाळेबाहेर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळांत उपस्थित राहण्याची आता विद्यार्थ्यांना गरज आहे, अशी प्रतिक्रीया व्यक्त हाेत आहे.
दीपावलीच्या सुट्टीनंतर सोमवारपासून बहुतांश राज्यभरातील शाळा पुन्हा शाळा सुरू होत आहेत. पहिलीपासून शाळा सुरू होतील असे वाटले होते. मात्र टास्क फोर्सने दिलेल्या निर्णयामुळे अडचणीचे वाटत आहे. शालेय वर्गातील वर्गवारी पाहताना सर्वाधिक नुकसान हे लहान गटातील मुलांचे झाले आहे. तब्बल पावणेदोन वर्षे या मुलांनी शाळेचे व शिक्षकाचे तोंड देखील पाहिले नाही. अशा परिस्थितीत सध्या कोरोना कमी झालेला असताना देखील तिसऱ्या लाटेचा बागुलबुवा करून मुलांना शिक्षणापासून दूर लोटण्याचे काम टास्क फोर्स करत आहे.अशी टीका शिक्षणतज्ज्ञ करीत आहेत.
टास्कफोर्सचे आतापर्यंतचे सर्व अंदाज चुकलेले आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित पालक काही प्रमाणात मुलांचे शिक्षण ऑनलाइन किंवा इतर मार्गाने सुरू ठेवत असले तरी विद्यार्थी आकलनावर मोठा परिणाम झालेला आहे.
अशिक्षित किंवा मूलभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या बालकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. सर्व अनलॉक झाले असताना आता शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सला नेमकी कशाची भीती आहे हे कळत नाही. असा सवाल पालकांनी केला आहे. जिथे रुग्ण सापडत आहेत. त्या पुरता हा निर्णय योग्य आहे. पण जिथे वर्षभरापासून रुग्णच नाहीत तिथल्याही शाळा बंद ठेवणे हे अतिशय संतापजनक आहे. मुले बाहेर खेळतात, मास्क लावत नाही. मार्केटमध्ये जातात मग शाळेत कोरोनाची भीती का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.