अकोला, दि.१९: महाराष्ट्र राज्य परिक्षा, पूणे यांच्यामार्फत शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) परीक्षा २०२१ रविवार दि.२१ सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी दीड ते साडेचार या दोन सत्रात होणार आहे. त्या अनुषंगाने संबंधीत परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून परीक्षा केंद्रांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जारी केले आहेत.
या आदेशान्वये संबंधित परीक्षा केंद्रावर रविवार दि.२१ रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरातील व केंद्राचे बाहेरील लागून असलेल्या १०० मीटर परिसरात हे आदेश लागू राहतील. त्यानुसार, परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणार नाहीत. परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परिक्षार्थी / अधिकारी /कर्मचाऱ्यांचे थर्मल/ इंफ्रारेड थर्मामिटरद्वारे तापमान तपासण्यात येईल. सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणे अनिवार्य आहे. हवा खेळती राहण्याचे दृष्टीने परीक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघडे ठेवण्यात येतील. सर्व अधिकारी/ कर्मचारी तसेच परिक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. ओळखपत्र असल्याशिवाय व मास्क लावल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. प्रत्येक परिक्षार्थी मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहील, अशी बैठक व्यवस्था करण्यात यावी. परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. परीक्षा केंद्राच्या परिसराची सोडियम हायपोक्लोराईडच्या सहाय्याने निर्जंतूकीकरण करण्यात यावे. कोणत्याही परिक्षार्थी / अधिकारी / कर्मचारी यांना कोविड -१९ ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजिकच्या रूग्णालयात भरती करावे. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॅाक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल फोन, सेल्युलर फोन इ. मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती / वाहनास प्रवेशास मनाई राहील. हे प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी / कर्मचारी / परिक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांना परिक्षा संबंधीत कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने लागू राहणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.