अकोला, दि.19: खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा फेब्रुवारी-2022 मध्ये हरियाणा येथे होणार आहे. खो-खो, कबड्डी व बॉस्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेकरीता सोमवार दि. 22 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज सादर करा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.
खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत 21 खेळाचा समावेश असून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा निवड चाचणीकरीता बास्केटबॉल या खेळाकरीता 18 वर्षातील मुलींना मंगळवार दि. 23 नोव्हेंबर रोजी व खो-खो व कबड्डी खेळाकरीता मुलांनी बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे सकाळी नऊ वाजता उपस्थित रहावे.
जिल्हास्तरीय कबड्डी व खोखो स्पर्धेतील विजयी संघ हा विभागस्तर स्पर्धेकरीता पात्र ठरेल व जिल्हा व विभागस्तरावरील हरलेल्या संघातील उत्कृष्ट खेळाडू व निवड चाचणीसाठी आलेल्या खेळाडूंमधील पाच खेळाडूंची निवड पुढीलस्तरावर निवड चाचणीकरीता करण्यात येईल. बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेतील विजयी संघ थेट राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व करतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. स्पर्धेकरीता होणारा खेळाडूंना प्रवास, भोजन व इतर खर्च स्वत: करावा लागेल.
1 जानेवारी 2003 नंतर जन्मलेल्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येईल. तसेच कबड्डी या खेळाकरीता मुले खेळाडूकरीता वजन 70 किलोच्या आत व मुलींकरीता 65 किलोच्या आत असणे आवश्यक आहे. शाळा किंवा क्लब यांचे संघ तसेच शाळा बाह्य संघात सहभागी न झालेले खेळाडू जिल्हास्तरावर निवड करीता उपस्थित राहु शकतील. स्पर्धाच्या निवड चाचणीकरीता खेळाडूंनी आधार कार्ड, दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट, जन्म दाखला आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे. स्पर्धेकरीता सहभागी होण्याकरीता संबंधित खेळाच्या संघानी सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे अर्ज सादर करावा. उशीरा प्राप्त अर्जाचा स्पर्धेकरीता सहभागी होता येणार नाही.
कबड्डी स्पर्धेकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय खोकले व जिल्हा कबड्डीचे सचिव वासुदेवराव नेरकर, बास्केटबॉल स्पर्धेकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मीशंकर यादव व जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव पुरण गंगतीरे, खो-खो स्पर्धेकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय खोकले व जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव अवधुत ढेरे यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता मोठया संख्येने खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले.