अमरावतीमध्ये उसळलेल्या दंगलीच्या मागे अमरावतीमधील मुस्लिम लिग, रजा अकादमी, भाजपचा हात असल्याचा अहवाल राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने राज्याच्या गृह विभागाला सादर केला आहे.
त्रिपुरामधील घटनेनंतर राज्याच्या काही भागांत दंगल उसळली होती. या दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह (कायदा व सुव्यवस्था) चार दिवस अमरावतीमध्ये मुक्काम ठोकून होते. या काळात त्यांनी घटनास्थळांना भेटी दिल्या व स्थानिकांकडून व जिल्हाधिकाऱयांमार्फत माहिती मिळवली. त्या आधारावर त्यांनी अहवाल तयार करून राज्याच्या गृह विभागाला सादर केला आहे.
त्यामध्ये स्थानिक पोलिसांना अमरावतीमधील परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवला आहे. अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा का बंद झाली याचाही त्यांनी आढावा घेतला. मालेगाव व इतर काही जिह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करावी लागली नाही, असेही निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या आठ कंपन्या नागपूर, हिंगोली, जालना व अन्य बाहेरच्या जिह्यांतून बोलवाव्या लागल्या, असेही नमूद केले आहे.
लेटरहेडच्या आधारावर गुन्हे
अमरावतीमध्ये पहिल्या दिवशी मुस्लिम संघटनांनी बंदचे आवाहन केले. अमरावतीमधील मुस्लिम लीग, रजा अकादमी अशा संघटनांनी बंद पुकारण्याबाबतचे निवदेन पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱयांना सादर केले. त्यानंतर दुसऱया दिवशी भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने बंद पुकारण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना दिले. त्या आधारावर या संघटनांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ज्या संघटनांनी त्यांच्या लेटरहेडवर बंदचे निवेदन दिले त्या लेटरहेडच्या नावावर गुन्हे दाखल झाले आहेत, असेही अहवालात नमूद केले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह (कायदा व सुव्यवस्था) यांनी हा अहवाल गृह खात्याच्या अपर मुख्य सचिवांना पाठवला आहे.