अकोला, दि.15 : राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग बाधितांना निशुल्क सेवेचा फायदा मिळावा याकरीता दि. 15 ते 25 नोहेंबर या कालावधीत क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. याकरीता प्रशिक्षीत आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक गृहभेटीव्दारे सक्रिय क्षयरुग्ण शोध घेणार आहे. या मोहिमेचा लाभ मोठया प्रमाणात घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अलका बोराखडे यानी केले आहे.
झोपडपट्टी, विट भट्टी, भटक्या जमाती, कामासाठी स्तलांतरीत तसेच खानीमध्ये काम करणारे कामगार, बेघर, सामाजिक गट, वृध्दाश्रम, आश्रमशाळा, वसतीगृह आदि ठिकाणी सक्रिय क्षयरोग बाधीतांची शक्यता जास्त असते. या मोहिमेच्या कालावधी क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते यांचेमार्फत घरोघरी जाऊन जोखीमग्रस्त भागातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लक्षणे आढळलेल्या व्यक्तीचे थुंकी नमुने, क्ष किरण तपासणी व इतर आवश्यक चाचण्यांव्दारे क्षयरोगाचे निदान करण्यात येणार आहे. निदान झालेल्या प्रत्येक क्षयरुग्णास औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे. दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला किंवा दोन आठवडयापेक्षा मुदतीचा ताप, मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट, मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही थुंकीवाटे रक्त पडत असल्यास, एक महिन्यापासून छातीत दुखणे किंवा उपचार घेत असेल असे लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी.
शासना मार्फत 1 एप्रिल 2018 पासुन नव्याने निघणाऱ्या खाजगी व सरकारी दवाखान्यातील सर्व क्षयरुग्णांना दरमहा पाचशे रुपये अनुदान निक्षय पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहाराकरीता औषधोपचार सुरू असे पर्यत देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकखाते क्रमांक व आधार क्रमांक आशा व आरोग्य कर्मचारी यांना देण्यात यावे. तसेच सर्वेक्षणाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करुन या मोहिमेचा नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले.