अकोला: दि.15: कोविड लसीकरण प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांव्दारे जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. लसीकरण जनजागृती मोहिम उत्कृष्टपणे राबविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनाव्दारे बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण 100 टक्के करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्याव्दारे जनजागृती करतील. उत्कृष्टपणे जनजागृती करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनाच्यावतीने प्रमाणपत्र व काही विद्यार्थ्याना टॅब बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत जे विद्यार्थी जनजागृती करतील त्यांनी कुटूंबातील किंवा परिसरातील व्यक्तीच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील. एका व्यक्तीचे प्रमाणपत्र एकच विद्यार्थी सादर करेल याची खात्री शाळेचे मुख्याध्यापक करतील. तसेच विद्यार्थ्यांनी दि. 12 नोव्हेंबर 2021 नंतर जनजागृती करुन लसीकरण झालेल्या व्यक्तींची अचूक माहिती सादर करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील. या मोहिमेचा कालावधी दि. 25 नोव्हेंबरपर्यंत तर बक्षीस वितरण कार्यक्रम नोव्हेंबर अखेर राहिल.